आमदार कुल यांना आम्ही साथ दिली आता त्यांनी आमच्या लोकांना संधी द्यावी, ॲट्रॉसिटी चा कायदा अस्तित्वात मात्र – जोगेंद्र कवाडे

अख्तर काझी

दौंड : विधानसभा निवडणुकीवेळी आमच्या पक्षाच्या लोकांनी आमदार राहुल कुल यांना साथ दिली होती आता त्यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्या लोकांना संधी द्यावी, अहिल्यानगर येथील सोनई गावात काही उपद्रवी लोकांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून अमानुषपणे व अत्यंत क्रूरतेने मारहाण केली, फलटण मध्ये एका मागासवर्गीय महिला डॉक्टरवर पोलीस उपनिरीक्षकाने लैंगिक अत्याचार केले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली अशा असंख्य घटना सध्या रोज घडत आहेत. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, पिडीताना वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही. दलितांच्या रक्षणासाठी असलेला ॲट्रॉसिटी चा कायदा अस्तित्वात आहे परंतु तो प्रभावीपणे राबविला जात नाही अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे (सर) यांनी व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड मध्ये पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे तसेच पक्षाचे पदाधिकारी राजू जाधव, संजय आढाव, मनोहर सोनवणे, संजय गायकवाड, सुनील थोरात, प्रमोद राणेरजपूत, किशोर पाटोळे, चंद्रकांत सोनवणे तसेच माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याबाबत कवाडे म्हणाले की, महायुतीचा मित्रपक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीने लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मित्र पक्षांना आश्वासित केलेले आहे. दौंड विधान सभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे राहुल कुल यांना पक्षाने पाठिंबा दिला. पक्षाने कुल यांच्या विजयासाठी मेहनत घेतली आता कुल यांनी आमच्यासाठी मेहनत घ्यावी. आगामी निवडणुकांमध्ये आरक्षित जागेवर आमच्या पक्षाला संधी द्यावी, म्हणजेच नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला स्थान मिळावे आणि जर असे झाले नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा सुद्धा कवाडे सरांनी दिला आहे.

कवाडे पुढे म्हणाले, शिव- शाहू -फुले -आंबेडकरांचा आदर्श असणाऱ्या महाराष्ट्रात दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचारांची दखल सरकारने घ्यावी. घटनेतील पिडीतांना पोलीस सहकार्य करीत नाहीत, न्यायासाठी वर्षानुवर्ष गुन्हे कोर्टात चालतात. असे गुन्हे जलद गती न्यायालयात चालविण्यात यावेत आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा दलितांचे रक्षण करण्यासाठी आहे इतरांना त्रास देण्यासाठी नाही हे ध्यानात घ्यावे.

फलटण मधील मागासवर्गीय महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात राजकारण न करता पीडीतेला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक असल्याने मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी याकरिता एसआयटी मार्फत तपास व्हावा अशी मागणी करणार आहे. या घटनेतील आरोपींना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींमध्ये खासदाराचे नाव येते हे दुर्दैव आहे असेही जोगेंद्र कवाडे म्हणाले.