दौंड : दौंड तालुक्यामध्ये अनधिकृतपणे शेतीचे तुकडेकरून प्लॉटिंग करण्याचा घाट अनेकांनी घातला आहे. अनधिकृत प्लॉटिंग करून विकण्यामध्ये यवत, केडगाव, बोरिपार्धी, वरवंड ही गावे अग्रेसर असून विविध गावांमध्ये शेती झोन असताना आणि शेत जमीन आकृषिक केलेली नसतानाही काही एजेंट आणि ब्रोकर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची मोठी फसवणूक करत त्यांना विश्वासात घेऊन एक-दोन गुंठ्याचे प्लॉट विकत असल्याचे आता समोर येत आहे.
यवत, केडगाव, बोरिपार्धी, वरवंड ही गावे पीएमआरडीए (PMRDA) च्या हद्दीमध्ये येतात मात्र pmrda ची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता शेती झोनमध्ये एक,दोन,तीन पाच गुंठे असे अनधिकृत प्लॉटिंगचे ले आउट तयार करून ते विकण्याचा प्रकार सध्या जोमात सुरु झाला आहे. हे अनधिकृत प्लॉट विकल्यानंतर pmrda ची कसलीही बांधकाम परवानगी न घेता त्या प्लॉटवर त्वरित अनधिकृत बांधकामही सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे या अनधिकृत प्लॉट विकणाऱ्या एजंट आणि ब्रोकरला काही अधिकाऱ्यांचा आतून तर सपोर्ट नाही ना अशी चर्चाही नागरिकांमध्ये रंगत आहे.
न्हावरा-चौफुला हायवे असो किंवा वाड्या वस्त्या असोत, प्रत्येक ठिकाणी हे अनधिकृत प्लॉटिंगचे जाळे विनलेले दिसत आहे. काहींनी तर pmrda हद्दीतील असणाऱ्या प्लॉटमध्ये वेगवेगळी शक्कल लढवून त्या जमिनी आकृषिक करून घेतल्या आहेत मात्र ज्या कारणासाठी त्या आकृषिक केल्या आहेत ती बाजूला ठेऊन ते प्लॉट करून विकण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे अश्या बहाद्दरांवर पुराव्यानिशी लवकरच कारवाई होईल असे सध्याचे वातावरण दिसत आहे.
शेवटी कोणत्याही अनधिकृत कृत्यामध्ये कोणताही अधिकारी आपली मान अडकू देत नाही तर ज्यांनी ज्यांनी हे प्लॉट तयार केले आणि ज्यांनी ज्यांनी ते विकत घेतले अश्या सर्वांवर लवकरच कारवाई होईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुप्त वार्ते दरम्यान दिली आहे.