Pune metro – पुणे मेट्रो ट्रायल रन चे उद्घाटन, निधी कमी पडू देणार नसल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही



|सहकारनामा|

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार याांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना आधुनिअक, आरामदायी प्रवासाचं जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करणारी ही ट्रायल रन ठरणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्यानं ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितलं जातं. या ऐतिहासिक नगरीचा आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. मेट्रोमुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचं आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचलं आहे असे सांगितले. 



पुणे मेट्रो च्या कामाबद्दल आणि पुढील प्लॅन बद्दल माहिती देताना त्यांनी पुणे मेट्रोनं उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावं,  कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतचं पुणेकरांचं वेळेचं गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेचं काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही मेट्रोचं काम सुरु होतं. ६० टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झालं आहे. अत्यंत वेगानं, विश्वासानं, निर्धारानं व कोणताही अपघात न होता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 



यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत आहे. पुणे मेट्रोची सगळ्या मार्गांची कामं पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतूक कोंडीचा, प्रदुषणाचा ताण कमी होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहोचू शकतील. दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित पुणेकर भविष्यात पाळू शकतील. मेट्रो रेल्वे सेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्यानं प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहनं कमी झाल्यानं त्या माध्यमातून होणारं प्रदुषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल. 



पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावेल, तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर धावेल. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठं आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्षेत्र आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे,५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे आदींचा समावेश आहे. जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्यानं, ८ जैव विविधता उद्यानं व १६ नागरी उद्यानं यांचाही विकास आराखड्यात समावेश आहे. याशिवाय ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्त्वाचे प्रकल्प विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.