बौद्ध बांधवांवरील अत्याचाराच्या विरोधात दौंडमध्ये विविध संघटनांचा निषेध मोर्चा

दौंड : अमरावती जिल्ह्यातील, दानापूर गावातील बौद्ध बांधव यांच्यावर जातीय द्वेषातून गाव गुंडांनी अन्याय केल्याच्या घटनेचा दौंडमधील सर्व संघटनांनी एकत्र येत निषेध नोंदविला. घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. बाबासो. आंबेडकर स्मारकासमोर निषेध सभा घेण्यात आली. दानापूर गावातील बौद्ध बांधव आपल्या शेतावर जाण्यासाठी पारंपारिक वहिवाटीच्या असणाऱ्या रस्त्याचा वापर करीत असताना गावातील गुंडांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली, त्यांना गावाबाहेर काढून अन्न, पाण्यावाचून वंचित ठेवण्यात आले. या जातीय वादी गुंडांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्या अधिकाऱ्याने सदर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्याचे निलंबन करण्यात यावे. तसेच घटनेची सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा दलित संघटनांनी केली. यावेळी अमित सोनवणे, अश्विन वाघमारे,भारत सरोदे, यादव जाधव, पांडुरंग गडेकर, राजू जाधव, सागर जगताप, संजीव आढाव, सागर उबाळे, निखिल स्वामी, सचिन कुलथे, रामेश्वर मंत्री तसेच येथील सर्वच दलित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दौंड पो. स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी संघटनांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.
सदर निषेध सभेचे आयोजन केल्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युवा आघाडी चे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे यांना दौंड पोलिसांनी नोटीस बजाविली, त्याचाही निषेध नोंदविण्यात आला. सदर घटनेत पोलीस प्रशासनाने वेळीच आपले कर्तव्य बजावले असते, गाव गुंडांना अटक केली असती तर आंदोलन करण्याची गरजच भासली नसती अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. जातीयवादी लोकांकडून ठरवून जर दलितांवर अन्याय होत असेल तर दलित संघटना देशव्यापी आंदोलन करणार असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.