दौंड मध्ये संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण, 7 जणांविरोधात ॲट्रॉसिटी दाखल

अख्तर काझी

दौंड : शहरातील डिफेन्स कॉलनी परिसरात राहणाऱ्या दलित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली असल्याची घटना घडली. याप्रकरणी एका तथाकथित भाईसह सहा जणांविरोधात मारहाण करणे तसेच ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर नरेश गायकवाड (रा. गोविंदराज रेसिडेन्सी ,डिफेन्स कॉलनी, दौंड) यांनी याबाबत फिर्याद दिली असून वैभव सुभाष चौधरी (रा. गजानन सोसायटी, दौंड) व इतर सहा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी हे खाजगी बँकेत नोकरी करतात. दि. 9 जुलै रोजी रात्री
12.30 च्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांचा नातलग आपल्या सोसायटीच्या गेट समोर गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी वैभव व त्यासोबतच त्याचे सहा साथीदार तेथे आले.

आरोपी तेथे येऊन ते विनाकारण फिर्यादी यांच्याशी बोलू लागले. फिर्यादी यांनी, तुमचे माझ्याकडे काही काम आहे का अशी विचारणा केली असता, माझे नाव वैभव चौधरी आहे, मी दौंडचा भाई आहे, मला ओळखले नाही का असे म्हणून वैभव व साथीदारांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण सुरू केली.

भांडणाचा आवाज ऐकून भांडणे सोडविण्यासाठी आलेले फिर्यादी यांचे वडील, आई, भाऊ ,पत्नी यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली. फिर्यादी यांच्या वडिलांना पुढील औषधोपचारासाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव करीत आहेत.