अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे काल सायंकाळी दोन युवकांवर साधारण 6 ते 7 जणांनी धारदार कोयते, तलवार आणि अन्य हत्यारांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याचे कारण आता समोर आले असून उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून या दोन युवकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी हर्षल बाळासो गायकवाड (रा.धुमळीचा मळा, केडगाव ता.दौंड, पुणे) यांच्या फिर्याफिवरू यवत पोलिसांनी सर्व आरोपींवर भा.द.वि.कलम 307, 143, 144, 147, 148, 149, 120 ब, आर्म अॅक्ट भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 1932 कलम 7, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)/135, नुसार गुन्हा दाखल केला असून यातील मुख्य आरोपी सलमान जैनुद्दीन राजे व त्याचे सहा ते सात साथीदार अजून फरार आहेत.
पॉकेसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 11/07/2023 रोजी साय.6ः30 वाजण्याच्या सुमारास केडगाव (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीतील आयुष रेसिडन्सी बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर आरोपी सलमान राजे याने त्याच्या प्लॅट नंबर 105 मध्ये फिर्यादीला त्याचे हात उसने घेतलेले दोन लाख रूपये परत देतो म्हणुन बोलावुन घेतले होते. फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ राहुल गायकवाड असे आरोपीच्या हॉलमध्ये बसले असताना अचानकपणे आरोपी सलमान राजे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी कट रचून हातात कोयता व तलवारी घेवुन दोघांच्या डोक्यात, हातावर, पायावर, पाठीवर, जोरदार हल्ला केला.
यावेळी आरोपींनी कट रचुन बेकायदेशीर जमाव जमवत व लोकांमध्ये दहशत निर्माण करून फिर्यादी त्यांच्या चुलत भावाला जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केले होते. आरोपी समोर आल्यास आपण त्यांना ओळखू शकतो अशी माहिती फिर्यादि यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत.