पुणे : शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजार पेठेतील सराफ व्यावसायिकास पिस्तूलाचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्ह्यातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतूस हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणला यश आले आहे.
शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलथे सराफ दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडीत (वय ५० वर्षे रा. शिरूर) हे दि. २८/०१/२०२४ रोजी संध्याकाळी ०८:३० च्या सुमारास दुकान बंद करत असताना मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी पिस्तूलाचा वापर करून सराफ दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भिका पंडीत यांनी विरोध केल्याने अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पिस्टल मधून भिका पंडीत यांचे डोक्यात पिस्टलचा बट मारला व त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी फायर केली होती.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या वतीने तात्काळ सुरू करण्यात आला. पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गुन्हेगार शरद बन्सी मल्लाव (रा. शिरूर ता. शिरूर जि पुणे) याने त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर (रा. धायरी पुणे) याच्या मदतीने केला असल्याचे समजले.
सदर आरोपींवर लक्ष केंद्रीत केले असता, सदरचे आरोपी हे सिंहगड किल्ल्याच्या जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ला परीसरातील जंगलातून गुन्ह्यातील मुख्य आरोपी शरद बन्सी मल्लाव (वय २४ वर्षे, रा. काचीआळी, शिरूर ता शिरूर जि पुणे) यास पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. तसेच त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय २३ वर्षे रा. धायरी पुणे) हा जखमी असून तो ससून हॉस्पीटल पुणे येथे उपचार घेत असल्याने त्यास अटक करण्यात येणार आहे.
सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून आरोपी शरद मल्लाव याच्यावर बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याबाबतचे एकूण ७ गुन्हे दाखल असून सदर आरोपी हा पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करणेत आलेले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याच्यावर शरीराविरूद्धचे ०२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल (पुणे ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (पुणे विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो. स.ई. गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, पोलीसअंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपकसाबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे तसेच शिरूर पोस्टे चे पोसई एकनाथ पाटील, पोलीसअंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीरिमांड मध्ये असून पुढील तपास पोनि ज्योतीराम गुंजवटे व पोसई एकनाथ पाटील हे करत आहेत.