उद्धव ठाकरे गटाच्या तोफा उद्या केडगाव बाजार मैदानात धडाडणार, भव्य ‘कृषी प्रदर्शनानिमित्त’ ‘सुषमा अंधारे’, ‘आ.सचिन अहिर’ उद्या केडगावमध्ये

दौंड : शिवसेना दौंड विधानसभा आयोजित भव्य कृषी महोत्सव २०२३ चा उद्घाटन समारंभ उद्या गुरूवार दि.१६/२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता केडगाव (ता.दौंड) येथील बाजार मैदानात पार पडणार असून या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सचिन अहिर यांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दिली आहे.

या अगोदर शिवसेनेच्या वतीने यवत येथे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्यानंतर शिवसेना नेते महेश पासलकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून केडगाव येथील बाजार मैदान या ठिकाणी भव्य अश्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी पाच वाजता शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर व महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ, रणरागिणी अशी उपाधी मिळालेल्या शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याहस्ते पार पडत असून यावेळी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके शिवसेना सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शिवसेना दौंड विधानसभा संपर्क प्रमुख संजिव शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि चालू घडामोडिंवर आ.सचिन अहिर आणि सुषमा अंधारे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.