अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये काही महत्वाच्या कामांमध्ये कायम आडमुठी भूमिका घेऊन आडवी मारत आलेल्या राजकीय गाव पुढाऱ्यांनी ही कामे पूर्ण झाल्यानंतर मात्र स्वतःची टिमकी मिरविण्यास सुरुवात केली आहे. दोन हाना पण पुढारी म्हणा अशी जी म्हण प्रचलित आहे त्याचा मोठा अनुभव सध्या केडगाव पंचक्रोशीतील नागरिकांना यामुळे येत आहे.
काम एकाचे, श्रेय घेतोय दुसराच… काही महत्वाच्या जागी कामे व्हावीत म्हणून ज्या सामाजिक आणि इतर क्षेत्रातील नागरिकांनी धडपड केली आणि वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहार करून कामे मंजूर करून घेऊन ती पूर्ण केली असे लोक या कामांच्या श्रेयवादासाठी कधीच पुढे आल्याचे दिसत नाही. मात्र ते काम होऊ नये म्हणून कायम त्या कामांना विरोध करणाऱ्या काही कुटील स्वयंघोषित गाव पुढाऱ्यांनी मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर स्वतःची टिमकी मिरवायला सुरुवात केली आहे. त्या कामांवर जाणे, फोटो काढून सोशल मिडियावर फिरवणे, आम्हीच काम केले असा अविर्भाव आणणे असे काहीसे प्रकार ते करताना दिसत आहेत. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन स्वतःची स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्या या महाभागांना मात्र नागरिकांनी पुरते ओळखले आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांवर नाराजी नसताना केवळ स्वयंघोषित गावपुढारी अश्या ठिकाणी किलबिलाट करत असल्याने स्थानिक नागरिकांनी अश्या कार्यक्रमांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. वरिष्ठ नेत्यांना या महाभागांचा मोठा फटका हा अनेक निवडणुकांमध्ये बसत आला असून अश्या गावपुढाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे.
ज्याने काम होऊ नये म्हणून अर्ज दिला तोच काम झाल्यावर श्रेयासाठी पुढे पुढे… काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे काम होऊ नये म्हणून एका ग्रामपंचायत सदस्याने अर्ज दिला होता मात्र ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांनी या अर्जाला केराची टोपली दाखवत या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले. हे काम पूर्ण होताच आडवे लागणारे महाशय फोटो काढायला सर्वात पुढे गेले आणि याच्या उदघाटनाला आता ते महाभाग सर्वात पुढे पुढे करत असल्याचा केविलवाणा प्रकार येथे पहायला मिळत आहे. त्यांचा हा प्रताप संपूर्ण गावाला माहित असून इतक्या खालच्या दर्जाची विचारसारणी एखाद्याची कशी असू शकते याची चर्चा सध्या रंगत आहे.
ना खाऊंगा, ना खाने दूंगा मुळे रस्त्यांचे काम झाले उत्कृष्ठ दर्जाचे
केडगाव परिसरामध्ये सध्या दोन सिमेंट रस्ते (मुस्लिम वस्ती, गायकवाड वस्ती) हे कामालीचे चर्चेत आहेत. या सिमेंट रस्त्यांची उंची, थिकनेस आणि त्याची कामाची उत्कृष्ठ पद्धत पाहता या रस्त्यांना वर्षानुवर्षे काहीच होऊ शकत नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य गजरमल यांनी या रस्त्यांच्या कामावर स्वतः उभे राहून ही कामे करून घेतली आहेत, त्यांनी ना खाऊंगा, ना खाने दूंगा हे ब्रीदवाक्य अंगीकारल्याने हे रस्ते खूपच उत्कृष्ठ झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र या अगोदर ज्यांनी सत्ता भोगली आणि त्यांच्या सत्तेच्या काळात जे रस्ते झाले त्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळत आहे. सिमेंट रस्ता झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आत त्या सिमेंट रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसत आहे. काही सिमेंट रस्ते तर कोंबड्या उकरु लागल्याने हा दोष नेमका कोंबडी मालकाचा की रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदार आणि गाव पुढाऱ्यांचा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.