अब्बास शेख
मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन झालेल्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अश्या आरोप प्रत्यारोपांचा तोफा धडाडणार आहेत.
आज दसऱ्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शक्तिप्रदर्शन करत दोन्ही बाजूंनी आरोपांच्या कोणत्या फैरी झाडल्या जातात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होत आहे. दोन्ही बाजूने खरी शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. आपली ताकद दाखविण्यासाठी दोन्ही गटाकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईत रात्रीपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल होताना दिसत आहे.
कुणाचा मेळावा कुठे होणार यासाठी वाद विकोपाला जाऊन शेवटी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होणार असल्याने शिंदे गटाने आपला दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात आयोजित केला आहे.
आपणच खरे शिवसैनिक आणि आपलीच शिवसेना खरी आहे हे दाखविण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आणून गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली असून यासाठी दोन्हीकडे लाखोंची गर्दी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो एसटी, बसेस, खासगी वाहने आणि बस चे नियोजन करण्यात आले असून लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
दोन्हीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त…
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी 2 डीसीपी, 3 एसीपी, 17 पोलीस निरीक्षक, 60 एपीआय/पीएसआय, 420 पोलीस कर्मचारी, 65 पोलीस हवालदार,2 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 2 QRT शीघ्र कृती दल, 5 मोबाईल वाहने अशी सुरक्षा असून
बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी 4 डीसीपी
4 एसीपी, 66 पोलीस निरिक्षक, 217 एपीआय/पीएसआय,1095 पोलीस कर्मचारी, 410 पोलीस हवालदार, 8 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 5 शीघ्र कृती दल, 14 मोबाईल वाहनं असा सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजच्या दसऱ्या मेळाव्यात कोण काय बोलतंय, आणि कोणत्या घोषणा होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.