अब्बास शेख
पुणे : रांजणगाव तिहेरी हत्याकांडाला अखेर वाचा फुटली असून ‘त्या’ महिला आणि दोन मुलांच्या खुन्याला पकडण्यात पुणे ग्रामिण पोलिसांना यश आले आहे.
काय होते प्रकरण – पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रांजणगाव गणपती गावचे हद्दीत असणाऱ्या पुणे-नगर हायवे लगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे रोडचे बाजूला काही अंतरावर एक महिला, दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह २४/०५/२०२५ रोजी स. ११:०० च्या दरम्यान आढळून आले होते. सदरचे मृतदेह हे मृत अवस्थेत व अर्ध जळालेले होते. सदरचे मृतदेह हे अनोळखी होते, सदर प्रकरणी बीट अंमलदार सहायक फौजदार गुलाबराव भिमराव येळे यांनी सरकार तर्फे फिर्याद नोंदविली होती. सदरचा प्रकार अंतिशय गंभीर असल्याने पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, एस.डी.पी.ओ. बापूराव दडस, दौंड विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर उप विभागातील पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांची तातडीने बैठक घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना देवून मार्गदर्शन केले.
या बाबींवर लक्ष केंद्रित केले.. मृतदेहातील महिलेचे हातावर असलेले “जयभिम, Rajratan, mon dad, R S अशा गोंदण (टॅटू चे आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध लावण्याकरीता सुरूवातीस ७ तपास पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे २५० सीसीटीक्ही कॅमेरांचे फुटेज वाघोली ते राहुरी पयंत चेक करण्यात आले. सुमारे १६,४०० भाडेकरू तपासण्यात आले, चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एम.आय.डी.सी.तील कामगारंकडे तपास केला गेला, तसेच मृतदेहाचे हातावरील नावाचे आधारे बँकामधील काही खातेदारांची माहिती घेवून तपास करण्यात येत होता. आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील सेविका यांच्याकडे लहान मुलांच्या अनुषंगाने तपास करून लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान हातात येणारे संशईत धागेदोरे पडताळण्यात येत होते, परंतु मृतदेहांची ओळख पटविण्यात यश येत नव्हते.
तपासात अनेक अडथळे येत होते मात्र… मृतदेह आढळून आले त्यावेळी पावसाचे प्रमाण खूप होते, त्यामुळे घटनास्थळाच्या आसपास कोणत्याही प्रकारे ठसे उमटल्याचे दिसून येत नव्हते, त्यातच दुर्गम भाग असल्याने घटनास्थळापासून जाणाऱ्या येणाऱ्या रोडवर दूर-दूर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हते.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून असा केला तपास – अखेर पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी त्यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण ३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात स्वत: बैठक घेतली आणि स्वतः सर्व अंमलदारांना सूचना करत एस.डी.पी.ओ. शिरूर प्रशांत ढोले व स्था.गु.शा.चे पो.नि. अविनाश शिळीमकर यांच्या अखात्यारीत एकूण ८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रवाना केली. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी अधिकारी यांचेशी पोनि अविनाश शिळीमकर व रांजणगाव पो.स्टे. चे पोनि. महादेव वाघमोडे यांनी समन्वय साधला. सर्व तपास पथकामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जावून मानव मिसींगची माहिती घेवून पडताळणी करण्यात आली.
बीड मध्ये असा सापडला आशेचा किरण – बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग नं. १२/२०२५ दि. ०९/५/२०२५ मध्ये एक महिला मिसींग असलेबाबत नोंद आढळून आली. सदर महिला ही मृत महिलेच्या वर्णनाची असल्याने त्याबाबत सखोल तपास करण्यात आला. मृत महिला व मिसींग महिला ही एकच असल्याची खात्री झाल्यानंतर मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५ वर्षे रा. वाघोरा, ता. माजलगाव जि. बीड) असे असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता, स्वाती सोनवणे ही तिचे दोन मुलांसह आळंदी येथे तिच्या आई वडीलांकडे गेली होती.
बहिणीचा दीर आणि चुलत अत्याचा पोरगाच निघाला खुनी – मृत स्वाती आणि तिच्या नवऱ्याचे भांडण होत असल्याने स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज (वय २ वर्षं) व विराज (१ वर्षे) यांच्यासह स्वातीच्या बहीणीचा दिर गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे, मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याच्या मोटार सायकलवरून दि. २३/०५/२०२५ रोजी रात्री ९ च्या सुमारास आळंदी येथून गेली असल्याची माहिती समोर आली. मृत महिला स्वाती केशव सोनवणे हिचे आई वडील हे आळंदी येथे मोलमजूरी करतात, त्यामूळे त्यांनी तिचे बाबत पुन्हा माहिती घेतली नाही. ती कोठे आहे हे त्यांना माहिती नव्हते त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांनी इसम गोरख पोपट बोखारे यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.
निर्दयी आरोपीने असा केला खून – आरोपी गोरख पोपट बोखारे याच्या भावाला मृत स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृत स्वाती ही आरोपीच्या चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत स्वाती व तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होते त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यातील वाद मिटवत असे. त्यादरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती. दि. २३/०५/२०२५ रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याच्याकडील मोटार सायकलवर स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेवून सरदवाडी शिरूर येये जात असताना रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे कच्या रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले – आरोपी गोरख पोपट बोखारे यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्यास मा. न्यायालया समक्ष उपस्थित केले असता दि. ११/६/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल (पुणे ग्रामीण), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. प्रशांत ढोले, शिरूरा विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्दर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो स्टेचे पो नि महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रा.चे पोनि विश्वास जाधव, स्थागुशा चे स.पो.नि., दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पो स्टे चे निळकंठ तिडके, पोसइ अविनाश थोरात, मपोसई सविता काळे, शिक्रापूर पो स्टे चे पोसईं महेश डोंगरे, स्थागुशा चे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टेचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टेचे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्ह्यात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर सुमीत वाघ यांनी केली आहे.