Big News : उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 100 जणांवर गुन्हे दाखल

सातारा : मा.खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समोरच त्यांच्या समर्थकांमध्ये काल मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले होते. या राड्यावरून आता सातारा पोलिसांनी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 100 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 100 जणांवर गर्दी जमवणे, दमदाटी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण…

एका जमिनीच्या वादातून दोघे आमने-सामने आले. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या उभारणीची तयारी शिवेंद्रराजेंकडून करण्यात आली. त्यासाठी रीतसर भूमीपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी या जागेवर एक कंटेनर तात्पुरतं कार्यालय म्हणून उभ करण्यात आलं होतं. पण काही वेळात उदयनराजेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कंटेनर जेसीबीच्या मदतीने उलटा केला. यानंतर या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवलं.
जागा कुणाच्या मालकीची?
सदर जागा आपल्याच मालकीची असल्याचा दावा उदयनराजे भोसलेंनी केला आहे. “ती जागा माझ्या मालकीची आहे. आज तुम्ही तिथे येऊन दगड ठेवणार, नारळ फोडणार, फटाके फोडणार? या प्रकरणात न्यायालयाचे स्थगिती आदेश आहेत. पण पोलीस त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे यावरचा सविस्तर ड्राफ्ट तयार करू. उद्या उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांच्यासमोर ही मांडणी करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

“जमीन सरकारनंच अधिग्रहीत करून दिली”
दरम्यान, सदर जमीन सरकारनंच उपबाजारासाठी अधिग्रहीत करून दिल्याचा दावा शिवेंद्रराजेंनी केला आहे. “कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभा करण्यासाठी शासनाकडून ही जमीन अधिग्रहीत करून देण्यात आली आहे. या जमिनीसाठी लागणारी रक्कम बाजार समितीनं भरली आहे. सर्व कायदेशीर गोष्टी केल्या आहेत. जमिनीचा सातबारा कमिटीच्या नावावर आहे. गेलं वर्षभर प्रशासक असल्यामुळे आम्हाला मार्केटचं काम सुरू करता आलं नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्ही घोषणा केली होती की सुसज्ज मार्केट इथे उभारण्यात येईल. त्यानुसार आम्ही काम सुरू केलं होतं”, असं शिवेंद्रराजे म्हणाले होते.