अब्बास शेख
दौंड : बाल लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दौंड तालुक्यातील पारगाव येथील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकाश किसन अडागळे (रा. पारगाव सालुमालु, गांढाळवाडी ता. दौड, जि. पुणे) असे या नराधमाचे नाव असून त्यास बारामती येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.ए. शेख सो यांनी आज बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदरचा गुन्हा दि. २३/०३/२०२१ रोजी दुपारी २.३० ते ३.०० च्या दरम्यान अल्पवयीन पिडीता ही पारगाव सालुमालु च्या गांढाळवाडी येथील किराणा मालाचे दुकानात मेंहदीची पुडी आणनेसाठी गेली असता आरोपी प्रकाश किसन अडागळे तेथे आला. आरोपीने पिडीतेला स्वतःच्या घरात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची फिर्याद पिडीतेच्या आईने यवत पोलीस स्टेशन येथे केली होती. सदर प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस
उपनिरिक्षक एस. ए. नागरगोजे यांनी केला व आरोपी याच्या विरुध्द बाल लैंगिक
अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,८,१२ व भा.द.वि. कलम ३७६,५०६ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदी होता.
सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर
यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी म्हणजेच पिडीतेची
आई यांनी न्यायालयात साक्ष दिली. सदर पिडीता ही ६ वर्षाची अल्पवयीन असूनही
तसेच सदर खटल्यामध्ये तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. मुलीच्या वयाबाबतचा पुरावा नसल्याने डॉक्टरांची साक्ष घेण्यात आली. त्यांची साक्ष खटल्याकामी हत्वपुर्ण ठरलेली आहे. तसेच डॉ. कार्तिक यांची साक्ष व न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तीवाद व वैद्यकीय पुरावा ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी प्रकाश किसन अडागळे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे २० वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि. कलम ५०६ प्रमाणे तीन महिने व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साधा कारावास
अशी शिक्षा सुनावली. तसेच पिडीतेस मनोधैर्य योजनेअंतर्गत तीस दिवसामध्ये नुकसान भरपाई देणेचा, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांना आदेश केला
आहे.
सदर खटल्यामध्ये सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांना यवत पोलीस
ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक एस. ए. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट
अंमलदार पो.ना. संतोष ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी नामदेव नलवडे तसेच
सरकारी वकील कार्यालयाचे क्लार्क सौ. वर्षा संतोष सुतार यांनी सहकार्य केले.