दौंड : दौंड तालुक्यातील दौंड-शिरूर हद्दीमध्ये असणाऱ्या भीमा नदी पात्राजवळ पारगावला खेटून असलेल्या नागरगाव (ता.शिरूर) हद्दीमध्ये पुन्हा एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तो पारगाव येथील रहिवाशी असल्याचे समजत असून भीमा नदी पात्राच्या पारगाव-नागरगाव हद्दीमध्ये हा मृतदेह सापडल्याने याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
पारगाव येथे भीमा नदी पात्रामध्ये दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने या परीसरात एकच खळबळ माजली होती. या सर्वांचा त्यांच्याच भावकीतील लोकांनी खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
आता पुन्हा आज सकाळी नागरगाव पारगाव हद्दीमध्ये असणाऱ्या भीमा नदीपात्राला खेटून हा पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. शिरूर पोलीस घटनास्थळी पोहचले असून या व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत शिरूर पोलिसांकडून तपास केला जात आहे.