पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) लोणीकाळभोर ते भागवतवस्ती (पाटस) अश्या एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते वरवंड ता.दौंड येथे पार पडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कुल यांच्या मागणीनुसार खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १७९.८८ कोटी रुपयांच्या निधीस विशेष दुरुस्ती विस्तार व सुधारणा अंतर्गत मंजुरी दिली आहे. या कॅनॉलचे अस्तरीकरण व मजबूतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढणार असून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच वरवंड गावठाण हद्दीतील जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) बंदिस्त करण्याच्या सुमारे २ कोटी ६५ लक्ष खर्चाच्या कामाचे देखील यावेळी भूमिपूजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमावेळी आमदार राहुल कुल यांनी बोलताना, स्व.आमदार सुभाष आण्णा कुल हे त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात काम करीत असताना नेहमीच पाण्यासाठी आग्रही असत, तोच वसा आणि वारसा आपण जपत तालुक्यातील नागरिकांना शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे, यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात तालुक्यातील पाणी प्रश्नावर आपण आवाज उठवला आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबत बैठका घेण्यात येऊन विधिमंडळात समितीकडे अर्ज सादर केला होता.
विधिमंडळात मिळालेल्या आश्वासनाबाबत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे बैठक घेण्यात आली. २०१९ ते २०२४ या कालावधीत सध्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक बैठका घेतल्यानंतर या सर्व पाठपुराव्याला यश आले आहे. सुरुवातीला किमी ९२ ते किमी १०९ (केडगाव ते पाटस) या परिसरातील कामाला सुरुवात होणार असून नंतर दुसऱ्या टप्प्यात किमी ७६ ते किमी ९२ (यवत ते केडगाव) या भागातील काम होणार असल्याची माहिती आ.राहुल कुल यांनी दिली.
यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, खडकवासला पाटबंधारे विभागच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, उपअभियांता यवत उपविभाग सचिन पवार, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव नाना बारवकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, संजय दिवेकर, तानाजी दिवेकर, एम. डी. आण्णा फरगडे, गोरख आण्णा दिवेकर, अशोक फरगडे, संतोष आखाडे, जयश्रीताई दिवेकर, डॉ. मधुकर आव्हाड, राजेंद्र मोटे, दशरथ पाटील गरदडे, सचिन सातपुते यांच्यासह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.