दौंड : शहरातील गांधी चौक परिसरातील मटका (जुगार) अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकीत कारवाई केली. याप्रकरणी सचिन दीपक गुंजाळ(रा. वडार गल्ली, दौंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडील जुगाराची साधने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गांधी चौकातील माही मिसळ नावाच्या हॉटेलमध्ये कल्याण मटका नावाचा बेकायदा जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सदर अड्ड्यावर कारवाईची सूचना केली. पो. उपनिरीक्षक महेश आबनावे,पो.कर्मचारी विकास गावडे, हेमंत भोंगळे यांनी या ठिकाणी छापा टाकला असता सचिन गुंजाळ लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका घेत असताना मिळून आला. पुढील तपास पो. हवा. पांडुरंग थोरात करीत आहेत.
शहरातील भीम नगर परिसरात सर्रासपणे गांजा विक्री होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. रात्रीच्या वेळेस या परिसरात ठीक ठिकाणी गर्दुल्ले गांजा ओढत बसत असल्याने संपूर्ण परिसरात गांजाची दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे येथील नागरिक या त्रासाने त्रस्त झाले आहेत. येथील गांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे