चाकण : पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात एका महिलेचा मृत्यू झाला असून स्फोटामध्ये पडलेल्या भिंतीमुळे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चाकण येथील राणूबाईमळा परिसरात ही घटना घडली आहे.
एक वृद्ध स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून
या स्फोटात चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय ७५) यांचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मीबाई बिरदवडे (वय ७८), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय ४०), अक्षय सुरेश बिरदवडे (वय १८), वैष्णवी ऊर्फ ताई सुरेश बिरदवडे (वय २०) हे जखमी झाले आहेत. इमारतीमधील अन्य भाडेकरूदेखील यात जखमी झाले आहेत.
चाकण परिसरातील रानुबाईचा मळा येथे हे दुमजली घर असून चंद्रभागा बिरदवडे ह्या स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाल्याचे सांगितले जात असून या स्फोटामुळे घराची भिंत कोसळल्याने यात अन्य लोक जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता.