|बारामती| महिलेच्या गळ्याला चाकू लावून 10 लाख 77 हजारांचा ऐवज लुटला

बारामती : बारामती तालुक्यातील चोपडज गावात एका महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्याला चाकू लावून सुमारे 10 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पुष्पलता बाळासाहेब जगताप (रा.चोपडज ता.बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 28/11/2022 रोजी रात्री 2 वाजता दोन अज्ञात दरोडेखोरांनी चोपडज येथे राहत असलेल्या फिर्यादीच्या घराचे पाठीमागिल सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढुन घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बेडरुममध्ये येवुन फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवुन ‘तुम चुप रहो, आपके पास जो है वह दे दो’ असे हिंदीत बोलुन त्यांना धमकी दिली.

यावेळी दुसऱ्या दरोडेखोराने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र जबरदस्तीने कटरने कापले तर दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या
बांगड्या तसेच बेडरुममध्ये असलेल्या
लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व
चांदीचे विविध दागिने व 85 हजार रोख रक्कम असा सुमारे 10 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

बारामती शहर आणि ग्रामीण भागामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बारामती पोलिसांनी सतर्क होऊन आता विविध भागात चोऱ्या करत असलेले चोरटे पकडण्यासाठी विशेष मोहीम आखण्याची गरज निर्माण झाली आहे.