दौंड : दौंड शहरातून जात असलेल्या अष्टविनायक महामार्ग रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे. शहरातील या रस्त्याचे काम करत असताना येथे काही पुरातन वास्तू अडथळा ठरत होत्या त्यामुळे त्या चर्चा करून काढण्यात आल्या.
आता याच कामात शहरातील काही वास्तू अडथळा ठरत आहेत. मात्र त्या न काढता उरलेल्या अरुंद जागेतूनच रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू असल्याने या कृत्याला दौंड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे दि. 5 एप्रिल रोजी नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येऊन अष्टविनायक महामार्ग रस्त्यासाठी अनेक वास्तू काढण्यात आल्या आहेत तर मग आता याच रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या काही वास्तू का काढण्यात येत नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित करत जर या वास्तू काढल्या नाही तर पाडलेल्या वास्तू पुन्हा त्याच जागेवर बांधून देण्यात याव्यात अशी मागणी वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
अडथळा ठरणाऱ्या या वास्तू काढण्यासाठी एका माजी नगरसेवकाने ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची मागणी केलेली असून त्यामुळेच हे काम रखडले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अश्विन वाघमारे व मा. नगरसेवक राजेश गायकवाड यांनी केला आहे. मागनीचे निवेदन देताना वंचितचे अश्विन वाघमारे, बंटी वाघमारे, अक्षय शिखरे, अजिंक्य गायकवाड, आनंद रणधीर, राहुल नायडू तसेच मा. नगरसेवक राजेश गायकवाड, पिंकू झेंडे आदि उपस्थित होते. पक्षाच्यावतीने पोलीस निरीक्षक विनोद घुगे व नगरपालिकेच्या उप. मुख्याधिकारी गुरव यांना निवेदन देण्यात आले असून पक्षाची मागणी मान्य न झाल्यास व रस्त्याचे काम दोन दिवसात मार्गी न लागल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.