5 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईतास दौंड लोहमार्ग पोलिसांनी केले जेरबंद

दौंड : एटीएम फोडून पैशाची लूट करणारा व पाच वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगारास अखेर दौंड लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तुषार उर्फ बंटी दत्तात्रय लिवुरकर(रा. पंढरपूर, जिल्हा सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी बंटी मागील पाच वर्षापासून त्याच्या विरोधातील गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर रहात नव्हता. त्यामुळे पोलीस वॉरंट बजावणीसाठी त्याच्या घरी गेले असता तो मिळून येत नव्हता. प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत होता. या सराईत गुन्हेगारास न्यायालयामध्ये हजर करणे अत्यंत जरुरीचे झाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इरफान शेख तसेच सहा. पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार अनिता पठारे तसेच पवार ,कसबे ,कुवर या पोलीस पथकाने पंढरपूर येथील स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून व पंढरपूर येथे मुक्काम ठोकूनच आरोपीवर पाळत ठेवली होती.

सावज टप्प्यात येताच त्याला मोठ्या शीताफिने वरील पोलिस पथकाने आपल्या ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एटीएम फोडून पैशाची चोरी करणे तसेच इतर चोरींचे गुन्हे दाखल आहेत.