अख्तर काझी
दौंड : गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून प्रत्येक वेळी आपल्या भावनांना आवर घालीत पोलीस 18-18 तास रस्त्यावर कर्तव्य बजावीत असतात, मनात असतानाही त्यांना आपल्या सारखा आनंद घेता येत नाही. आज मात्र(दि.9) दौंड पोलिसांनी गाण्यांच्या तालावर व डीजेच्या ठेक्यावर ताल धरीत मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला.
दौंड पोलीस स्टेशन कार्यालयाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आपल्या पोलीस बांधवांना मनसोक्त नाचताना पाहून येथील युवा वर्गाने ही त्यांना दाद देत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे या आपल्या अधिकाऱ्यांना खांद्यावर घेत पोलीस नाचत होते. पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांनी मिरवणुकीत परिधान केलेला पांढरा कुर्ता -पायजमा व डोक्यावर रंगीत फेटा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. एरवी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मनात इच्छा असतानाही पोलिसांना आपल्या कर्तव्यामुळे कार्यकर्त्यांसारखे सहभागी होता येत नाही.
त्यामुळे शहरातील विसर्जन मिरवणूक सुरू होण्याआधी सकाळच्या सत्रातच पोलिसांनी आपल्या बापाची विसर्जन मिरवणूक काढली व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मंडळाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे मिरवणुकीचा आनंद घेतला व दुपारनंतर सुरू होणाऱ्या शहरातील विसर्जन मिरवणूकित कोणतेही विघ्न येणार नाही व मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी पोलीस बांधव बंदोबस्तावर तैनात झाले.