अब्बास शेख
पुणे : पुण्यातील मावळ भागातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे तर २०० ते २५० जण पुलावर उभे होते असे सांगितले जात आहे. ही घटना पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर घडली आहे. आमदार सुनील शेळके यांनी ही या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्वात अगोदर TV9 ने जाहीर केली आहे.
कसा झाला अपघात –
मिळत असलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ०३:३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक जुना आणि जीर्ण झालेला पूल आहे. या पुलावर पर्यटक असतानाच हा पूल कोसळल्याने या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी पुलावर सुमारे २०० ते २५० जण होते आणि पूल तुटल्यानंतर ते नदीच्या पाण्यात फेकले गेले असल्याचे सांगितले जात आहे.