अख्तर काझी
दौंड : छत्रपती संभाजी नगर येथून दौंड तालुक्यातील एमआयडीसी येथे कामानिमित्त आलेल्या कुटुंबातील एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुली बरोबर अनैसर्गिक कृत्य करीत नराधमाने तिचे लैंगिक शोषण केले असल्याची संताप जनक घटना समोर आली आहे. पिडीतेच्या फिर्यादी वरून दौंड पोलिसांनी नराधम राहुल संजय गव्हाणे ( सध्या रा. दौंड) विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 115(2),35(2),65(1),75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 1 मे ते 19 जुलै 2024 दरम्यान कुरकुंभ एमआयडीसी मधील चितळे प्लॉट परिसरात घडली आहे. पाच महिन्यापूर्वी पीडिता आपल्या आई व लहान भावासोबत छत्रपती संभाजी नगर येथून पुण्याला आली. तेव्हा आरोपी राहुल त्यांना घेण्यासाठी तेथे आला होता. आरोपीने या कुटुंबाला दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील चितळे प्लॉट परिसरातील भाड्याच्या खोलीत ठेवले. तेव्हापासून पीडिता आपल्या आई व भावाबरोबर तिथे राहत होती. आरोपी घरी येत होता व अभ्यास करण्याच्या बहाण्याने पीडीतेला जवळ बोलवत, लज्जा उत्पन्न होईल असे बॅड टच करीत होता. पीडितेने नकार दिल्यास तो तिला मारहाण करायचा.
एक दिवस आई बाहेर गेल्याचे पाहून आरोपी घरात आला व पिडीत मुलीला पाणी आणण्यास सांगून तिला जवळ घेत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा सर्व प्रकार मी आईला सांगणार आहे असे पिडीता म्हणाली असता तुला व तुझ्या आईला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे पीडिता गप्प राहिली. अशाच एके दिवशी आई बाजाराला गेली आहे असे पाहून आरोपी घरात आला त्याने पिडीतेला जवळ ओढत अश्लील चाळे केले तसेच तोंड दाबून तिच्या इच्छेविरोधात तिचे लैंगिक शोषण केले.
त्या दिवसापासून आरोपी तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत होता, आरोपीने तिच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीच्या शोधासाठी दौंड पोलिसांचे पथक रवाना झाले असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
सदरचा गुन्हा छत्रपती संभाजी नगर येथील अजंठा पोलीस ठाण्यात दाखल होऊन घटनास्थळ कुरकुंभ येथील असल्याने दौंड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती बापू रोटे यांनी दिली.