दौंड : राज्य राखीव पोलीस जवानाचा अपघाती मृत्यू, पोलीस वसाहत परिसरात सेवा रस्ता नसल्याने जवानांचे जात आहेत बळी!

अख्तर काझी

दौंड शहर : शहरातून जात असलेल्या मनमाड -बेळगाव राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र.5 मधील जवान विवेक सतीश भोसले (वय 33,रा. बालाजी नगर, दौंड) या जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. दौंड पोलिसांनी अज्ञात वाहन व अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार दि. 21 एप्रिल रोजी रात्री 9 वा. दरम्यान विवेक भोसले आपल्या दुचाकीवरून येथील गोल राऊंड चौकातून बोरावके नगरच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली यामध्ये भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
राज्य राखीव पोलीस दल परिसरातील गोल राऊंड चौक ते बोरावके नगर रस्ता हा मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे. या रस्त्यालगत राज्य राखीव पोलीस वसाहत असून या परिसरामध्ये सेवा रस्ता बनविला नसल्याने वारंवार अपघात होऊन जवानांचे बळी जात आहेत. पोलीस वसाहतीसाठी सेवा रस्ता नसल्याने दैनंदिन कामासाठी किंवा कामावर रुजू होण्याकरिता पोलीस जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना या मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागतो आहे हे जीव घेणे ठरत आहे.

या रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रत्येक वाहन भरधाव वेगातच जात असल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या परिसरातील रस्ता अपघातामध्ये आज पर्यंत अनेक जवान व सामान्य नागरिकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे गोल राऊंड ते बोरावके नगर मार्गावर सेवा रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी होत आहे. अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा प्रश्नही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.