भुजबळांच्या ‛बालेकिल्ल्यात’ आज शरद पवारांची ‛सभा’, तर भुजबळही करणार ‛शक्तिप्रदर्शन’

मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना साथ देणाऱ्या आमदारांना धडा शिकविण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या बाले किल्ल्यांमध्ये जाहीर सभा घेण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे असे म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ आज नाशिक येथील येवला इथे फोडला जाणार आहे.

आज शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता नाशिक येथील येवला इथे ही सभा होणार आहे. येवला नंतर धुळे आणि जळगाव विभागाचाही दौरा आखण्यात आला असून पावसाचा अंदाज घेऊन लवकरच तो दौरा जाहीर करण्यात येणार आहे.

छगन भुजबळ ही करणार शक्तिप्रदर्शन…
अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ हेही आज नाशिकमधे येणार असून शरद पवार भुजबळ यांच्या बालेकिल्लात सभा घेत असतानाच छगन भुजबळ हेही आपले शक्ती प्रदर्शन याठिकाणी करणार असल्याचे समजते. भुजबळ यांचे दुपारी दोन वाजता नाशिकमधे भव्य स्वागत होणार असून पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे.

नवी दिल्ली येथे काय म्हणाले होते शरद पवार..
नवी दिल्ली येथे नुकतीच शरद पवारांची राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी, मला आनंद आहे की ज्यांना निलंबित करण्यात आले आहे ते वगळता उर्वरित लोक नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यसमितीच्या सदस्यांच्या बैठकीत उपस्थित होते. पक्षाला दुखावण्याचे काम काही लोकांनी केले. पक्ष पुन्हा बळकट करायचा, पुढे न्यायचा, चांगल्या स्थितीत आणायचा, ही आम्हा सर्व सोबत्यांची मानसिकता होती. म्हणूनच मला आनंद आहे की ही बैठक आमचा उत्साह वाढवण्यास उपयुक्त ठरली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. जर कोणी त्याच्या नावाबद्दल बोलले असेल तर तो म्हणू शकतो. पण यात तथ्य किंवा महत्त्व नाही.

निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे असे शरद पवारांनी म्हणत, आम्हाला जे काही म्हणायचे आहे त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगासमोर जाऊ. परंतु कायदेशीर स्थितीकडे दुर्लक्ष करून, कुठेतरी याचिका आल्यास आम्ही संबंधित यंत्रणेकडे जाण्याचा विचार करू. पण अशी परिस्थिती येईल असे वाटत नाही.

2024 मध्ये महाराष्ट्रात सरकार बदलेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे शरद पवारांनी म्हणताना, आज जे सत्तेत आहेत त्यांची जनताच हकालपट्टी करील आणि विरोधी पक्षात काम करणाऱ्यांवर ज्या प्रकारची पावले उचलली गेली त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. जनतेची मते मिळवून चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल. तिथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना संघटना, महाराष्ट्रातील जनता त्यांच्या हातात संपूर्ण सत्ता देईल. असे मत शरद पवार यांनी दिल्ली येथील बैठकीनंतर व्यक्त केले होते.