स्व.कि.गु.कटारिया महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण जनजागृती अभियान

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील भीमथडी शिक्षण संस्थेच्या स्व. की गु. कटारीया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पाटस या गावामध्ये प्लास्टिकचा वापर, व्यवस्थापन व पुनर्वापराबाबत जनजागृती अभियान राबविले. यावेळी पाटस बाजारपेठेतील व्यापारी व छोटे दुकानदार यांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्लास्टिक न वापरणे बाबत आवाहन केले.

येथील व्यापारी वर्गाने ही या जनजागृती उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सदरच्या उपक्रमात सहभागी होण्याचे लेखी हमीपत्र दिले . तसेच सदरचा उपक्रम राबविताना व्यापारी वर्ग व नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबॅग न वापरता कापडी पिशव्यांच्या वापराबाबत आश्वासन दिले. महाविद्यालयाच्या 30 विद्यार्थिनी व 20 विद्यार्थ्यांनी पाटस गावातून रॅली काढली व प्लास्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले.

सदरच्या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांनी भीमा पाटस साखर कारखान्यास अभ्यास भेट दिली. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापक बोडके तसेच शेडगे, चव्हाण, भोसले या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष समुद्र,श्रीकृष्ण ननवरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले .प्रा. निलेश साखरे,डॉ. विकास शेलार, प्रा.जाधव ,प्रा. कोकरे प्रा. खाटमोडे यांनी परिश्रम घेतले.