अब्बास शेख
दौंड : महाराष्ट्रावर ओढवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या आमदार राहुल कुल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मानधनाची रक्कम रुपये १ लाख २० हजार ही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे.
आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक वर्षाच्या मानधनाचा धनादेश आ.कुल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी
यवत येथील श्री दत्त ट्रान्सपोर्ट संदीप दोरगे यांनीही दुष्काळ सहाय्यता निधी म्हणून २५ हजारांची मदत दिली आहे. ही मदत स्विकारताना आ. राहुल कुल यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ.कांचन कुल, भीमा पाटसचे मा.संचालक तुकाराम ताकवणे, नातू, पवार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी आपले योगदान देणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. माझ्या या छोट्याशा योगदानातून दुष्काळग्रस्त बांधवांना दिलासा मिळावा ही यामागील भावना असल्याचे यावेळी सभापती चोरमले यांनी सांगितले.







