दौंड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी, शिवसेना दौंड व बेटी की रोटी फाउंडेशनच्या वतीने दौंडमध्ये फन फूड शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून ते दि. 8 मार्च ते 12 मार्च रोजी गोपाळवाडी रोड येथील हॉटेल राजधानी येथे होणार आहे.
या फेस्टिवलमध्ये मराठी उद्योजक व महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन होणार आहे. सदरचा उपक्रम राबवित असताना समाजामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने पाककला, युवतींसाठी मिस दौंड स्पर्धा, महिलांसाठी मिसेस दौंड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बच्चे कंपनीसाठी आनंद जत्रा हे फेस्टिवलचे खास आकर्षण असणार आहे.
सर्व दौंडकरांना फेस्टिवलचा आनंद घेता यावा यासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. महिला उद्योजकांना व बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी दौंडकरांनी फेस्टिवलला चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.