दरोडा, खुनाचा प्रयत्न करणारे दोन फरार आरोपी जेरबंद, LCB शाखेची कामगिरी



इंदापूर : सहकारनामा ऑनलाईन

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे दरोडा आणि खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोन आरोपींना तब्बल 3 महिन्यांनंतर जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे विभागाला (LCB) यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी दुपारी ०२.०० वा. चे सुमारास पोपट तुकाराम थोरवे हे त्यांचे शेतात काम करीत असताना त्यांचे शेतातून जाणारा खडी क्रशरचा हायवा त्यांनी आमचे जागेतून हायवा नेवू नका असे हायवा चालकास म्हणाल्याने त्याने बाळा दराडे त्याचे इतर ३ साथीदार तसेच क्रशर मालक गिरीश क्षिरसागर व गौरव क्षिरसागर यांना बोलावून घेवून बाळा दराडे याने पिस्तोलचा धाक दाखवून मी बारामती एमआयडीसी मधील डॉन आहे असे म्हणून गिरीश क्षिरसागर याने पोपटला जिवंत सोडू नका असे म्हणून तलवारीने डोळ्याचे बाजूला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीस हायवाचे पुढे आडवे पाडून याचे अंगावर ट्रक घालून मारून टाका असे म्हणाले त्यावेळी फिर्यादीची पत्नी सोडविणेस आली असता तिचे गळ्यातील मंगळसूत्र गंठण तसेच कर्णफुले जबरदस्तीने काढून फिर्यादीचे खिशातील पाकीटातले रोख ३५०० रूपये असा एकूण ६३,५००/- चा ऐवज चोरून नेला होता. तेथे फिर्यादीचे नातेवाइक आल्याने ते पळून गेले. सदर घटनेमुळे फिर्यादीचे कुटुंब दहशतीचे सावटाखाली होते. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील व बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मिणा यांनी गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपी पकडणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाने गुन्ह्याची माहिती घेवून सुमारे ३ महिन्यापासून गुन्हयात फरारी असलेले निष्पन्न आरोपी १) गिरीश विजय क्षिरसागर वय २७ वर्षे  २) गौरव विजय क्षिरसागर वय २५ वर्षे दोघेही राहणार सणसर, ता.इंदापूर जि.पुणे यांना सणसर ता.इंदापूर येथून ताब्यात घेतलेले आहे.

सदर आरोपींनी गुन्हा केल्याने व पोलीस मागावर असल्याने ते गावात राहत नव्हते. गुन्हे शाखेचे पथकास दि.१४ मे रोजी आरोपी हे घरच्यांना भेटण्यासाठी सणसर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी सणसर येथे जावून वेशांतर करून सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. लआरोपीस पुढील कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत. 

सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, अनिल काळे, रविराज कोकरे, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 

सदर गुन्हयातील आरोपी अतुल गावडे, विजय गोफणे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून विजय गोफणे याचेकडून पिस्तोल व २ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यावेळी त्यांचे सोबतचा आरोपी बाळा दराडे हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला होता. गुन्हयातील फरारी आरोपी बाळा दराडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द पुणे व सातारा जिल्हयात दरोडा, चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न,  बेकायदा शस्त्र बाळगणे, अपहरण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गर्दी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.