‘सुभाष बाबुराव कूल’ महाविद्यालयात पहिले ‘ग्रामीण विश्व साहित्य संमेलन’ संपन्न, दिग्गजांसह ‘अमेरिकेतील’ महिलांचीही हजेरी

दौंड : केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय व ग्रामीण विश्व साहित्य संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले ग्रामीण विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात दिग्गज मान्यवरांसाह अमेरिकेतील दोन महिलांनीही हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये नेताजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी ग्रामीण साहित्य संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून नवीन पिढीने हे काम समर्थपणे पुढे नेले पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त करत साहित्य हा समाजमनाचा आरसा असून साहित्यिकांनी समाजाभिमुख साहित्य निर्मितीवर भर द्यावा असे प्रतिपादन केले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी सर्वसामान्य लोकांच्या अश्रू व घामांनी भिजलेले साहित्य सर्वसामान्यांचे प्रश्न मांडू शकते तसेच साहित्यिकांनी समाजाच्या आशा आकांक्षांना बळ देऊन त्या राजकीय पटलावर ठेवाव्यात असे सुचविले. भारतीय समाजाचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यामध्ये साहित्याचे फार मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. स्वागताध्यक्ष या नात्याने त्यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या कवी व साहित्यिकांचे स्वागत केले.

या संमेलनामध्ये आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये डॉ. अरुण कोळेकर यांनी ग्रामीण साहित्यातून निर्माण होणारे मानवी मनाचे सहसंबंध उलगडून दाखविले तसेच ग्रामीण साहित्यामधील लोक तत्वाचे विश्लेषण केले. श्री मुकुंद काळे यांनी शंकरराव खरात यांची नाटक या कथेचे उत्कृष्टपणे कथाकथन केले. डॉ. अनुराधा गुजर यांनी जगदीश खेबुडकर यांच्या ग्रामीण गीतांमधील भावविश्व उलगडून दाखवताना सुरेल आवाजामध्ये काही गीते सादर केली. या संमेलनामध्ये सुमारे 25 कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली तसेच उखाणे स्पर्धेमध्ये महिलांनी सहभाग घेऊन संमेलनामध्ये रंगत आणली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या हास्य स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राची लोकधारा हा सदाबहार नृत्य गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संमेलनामधील दोन अमेरिकन महिलांची उपस्थिती विशेष आकर्षणाची बाब ठरली.

संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन, समन्वय व अंमलबजावणी यासाठी डॉ. अनुराधा गुजर यांनी परिश्रम घेतले. संमेलनाला निमंत्रक श्री. धनाजी शेळके , आम्रपाली धेंडे, प्रिया दामले, कार्याध्यक्ष अशोक आप्पा शेळके, खजिनदार सुभाष काका अवचट, रामभाऊ शेळके, शिशुपाल सर उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक दिवेकर, महादेव थोपटे, तन्वीर शेख, नानासाहेब जावळे, शोभा वाईकर, भाऊसाहेब गव्हाणे, भाऊसाहेब दरेकर, ओंकार अवचट, मनिषा जाधव , विशाल गायकवाड, राजेन्द्र गायकवाड, शाम वास्नीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.