दौंड | दापोडी येथे बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला, मेंढपाळाचा घोडा ठार

दापोडी : दौंडतालुक्यातील दापोडी या गावच्या जवळ असणाऱ्या फॉरेस्टमध्ये मेंढपाळ संतोष काळे यांच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन त्यांच्या घोड्याला ठार केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दापोडीच्या रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ संतोष काळे यांचा बकऱ्यांचा कळप रात्रीच्यावेळी या ठिकाणी बसलेला होता. या परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने रात्रीच्यावेळी त्यांच्या कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मेंढापाळाचा घोडा ठार झाला. घोड्याची शिकार केल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. 

या घटनेबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असून ते आज सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी पाहणी व पंचनामा करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती दापोडीचे सरपंच आबा गुळमे यांनी दिली आहे. दापोडी ग्रामस्थांनी सावध रहावे,  बिबट्या आपल्या परिसरामध्ये वावरत आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.