दौंड : शहर प्रतिनिधी
दौंडकरांसाठी शहरामध्ये एकमेव उद्यान आहे ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान, परंतु या एकमेव उद्यानाची ही मोठी दुरवस्था झाली आहे. उद्यानातील दुरवस्थेबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही नगरपालिका कोणतीच दखल घेत नसल्याने येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति संस्थेचे पदाधिकारी धरम बनसोडे, पांडुरंग गडेकर, तम्मा तालीम यांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात दिनांक 28 जुलै रोजी पासून अमरण उपोषण सुरू केले आहे.
सर्व महापुरुषांची जयंती नगरपालिकेच्या खर्चाने साजरी केली जाते त्याप्रमाणेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सुद्धा नगरपालिकेच्या वतीने साजरी केली जावी. उद्याना समोरील रस्त्यालगत असलेले विद्युत रोहित्र (डीपी) काढून रस्ता रुंद करावा, उद्यानातील लाईट व्यवस्था दुरुस्त करावी, उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी व व्यायामाची साधने बसवावीत तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरपालिकेने उद्यानामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा व दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यामुळे नगरपालिकेने जयंतीच्या आधी उद्यानातील सर्व कामे मार्गी लावावीत अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.