दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवा पिसे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत केडगाव पोलिसांनी सहकारनामाशी बोलताना याची पुष्टी केली आहे.
संपूर्ण दौंड तालुक्यात शिवा पिसे यांचा मोठा मित्र परिवार होता. ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी केडगाव विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. निवडणूक जिंकल्यानंतर ते मोठ्या आनंदात असल्याचे त्यांचे मित्र सांगत होते.
मात्र शिवा पिसे यांनी अचानक आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याने त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. शिवा पिसे हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवाराही मोठा होता. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकले नाही.