थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
– कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना शासनाने अनेक खबरदारीचे उपाय केले यात संपूर्ण लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर थेऊर येथील राईज अॅड शाईन बायोटीक प्रा.लि या कंपनीत आजही काही कामगार कामावर येत असल्याचा संदेश पसरल्यावर थेऊर येथील मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी याची खातरजमा करण्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. या पाहणीमध्ये शासनाच्या नियमानुसार येथे आवश्यक असलेल्या कामगाराकडून शेती व पाॅलिहाऊसचे काम चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी राईज अँड शाईन बायोटीकच्या व्यवस्थापकीय संचालक मायकेल मेन्डोसा यांनी माहिती देताना सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एकवीस दिवसाचा लाॅकडाऊन केल्यानंतर येथील कामकाज पूर्णपणे बंदच आहे परंतु येथील प्रयोगशाळेत उती संशोधन केले जाते लाखो रोपांची निर्मिती केली जाते त्यांची नियमितपणे देखभाल आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असलेल्या महिलांना कामावर केवळ चार तासासाठी बोलावले जाते यासाठी शासनाकडून परवानगी मिळवली आहे असे सांगत राईज अॅड शाईन बायोटीकच्या माध्यमातून परिसरातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना हातभार लावला जातो अशी माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी माहिती देताना लाॅकडाऊनच्या काळात पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे. कुठल्याही नागरिकांना काही अडचण असेल तर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करावी परंतु परस्पर सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट जाहिर करु नये त्यामुळे समाजात गोंधळ निर्माण होतो असे आवाहन केले.