बारामती : बिगबॉस मराठी सिजन 5 चा विजेता सुरज चव्हाण यास भेटण्यासाठी आलेल्या युवकाला तू सुरज चव्हाण यास भेटायला का आला असे म्हणत चौघांनी लाकडी दांडके, काठीने जबर मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेविषयी राहुल कांतीलाल बोराडे (रा.रांजणगाव ता.शिरूर जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिगबॉस विजेता सुरज चव्हाण यास फिर्यादी, त्यांचा भाऊ संजय कांतीलाल बोराडे, मित्र अजय खलसे, अविष्कार खोमणे, आदिनाथ बोडरे असे सर्वजण भेटण्यासाठी मोडवे (ता.बारामती) येथे आले होते. यावेळी फिर्यादी हे लघुशंकेसाठी मरीमाता मंदीराच्या पाठीमागे जात असताना आरोपी तुकाराम सदाशिव खोमणे, शुभम तुकाराम खोमणे, गौरव धोंडिबा खोमणे, ऋषिकेश वैभव नानावटे (सर्व रा.मुर्टी ता.बारामती) हे फिर्यादीच्या जवळ आले आणि तुम्ही सुरज चव्हाणला भेटण्यासाठी का आला असे म्हणुन आरोपी शुभम खोमणे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडके मारले.
मारहाण होत असताना फिर्यादी मोठ्याने ओरडले व खाली पडले. यावेळी गौरव धोंडीबा खोमणे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डाव्या पायावर, नडगीवर, मांडीवर मारहाण केली. तर आरोपी तुकाराम खोमणे, ऋषिकेश नानावटे यांनी हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ आणि दमदाटी केली. यावेळी आरोपी तुकाराम खोमणे याने फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार नागटिळक हे करीत आहेत.