बारामती : बारामती तालुक्यात बापानेच मुलाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा झोपेत असताना पहाटेच्या सुमारास त्याच्या डोक्यात पहारीचे घाव घालून बापाकडून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना माळेगाव येथील धुमाळवाडीत घडली असून माळेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लालासो धोंडिबा कोकरे (वय 59) यांना त्यांचा मुलगा गणेश लालासो कोकरे (वय 30) हा दारु पिवुन येवुन नेहमी त्यांना व त्यांच्या पत्नीला (आई वडिलांना) मारहान करुन जमीन वाटुन देण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळुन तो झोपलेल्या जागेवर झोपेमध्ये असताना लालासो धोंडीबा कोकरे यांनी घरातील लोंखडी पार घेवुन गणेश कोकरे याच्या डोक्यामध्ये ७ ते ८ वेळा मारुन त्याचा खुन केला.
ही घटना त्यांचा दुसऱ्या मुलगा अविनाश लालासो कोकरे (वय 27) याला समजल्यानंतर त्याने माळेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलिसांनी आरोपी लालासो कोकरे यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असतात त्यांस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली. अधिक तपास पोसई साळवे करीत आहेत.