अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील दंतचिकित्सक डॉ. सदानंद धुमाळ यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी डॉ. भावना धुमाळ (गायकवाड) यांनी, त्यांना त्यांच्या पतीने जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची तक्रार दौंड पोलिसात दिली आहे. दौंड पोलिसांनी डॉ.सदानंद धुमाळ व इतर दोघांवर ॲट्रॉसिटी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना अटक करण्यात आलेली नाही. डॉ.सदानंद धुमाळ सतत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत आहेत, असे असतानाही आपल्याला कोणाकडूनही न्याय मिळत नाही अशी मानसिकता डॉ. भावना यांची झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलून दाखवले आहे. यावेळी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची धक्कादायक मालिकाच त्यांनी पत्रकारांसमोर मांडली.
डॉ. भावना म्हणाल्या की, माझे पती डॉ. सदानंद धुमाळ सन 2016 पासून माझा मानसिक व शारीरिक छळ करीत आहेत,
जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत आहेत. घरात विभक्त ठेवण्यात आले आहे. माझ्या पतीचे शहरातील एका महिलेशी 2016 पासून अनैतिक संबंध आहेत. जेव्हापासून त्या दोघांमध्ये असे संबंध झाले आहेत तेव्हापासून माझे पती मला घरातून बाहेर काढण्याचा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी जून महिन्यामध्ये ही मी त्यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार केलेली होती व त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. परंतु त्यांनी या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यानंतर पुन्हा माझ्यावर ते अन्याय करीतच आहेत.
माझ्या खिशात पोलीस घेऊन मी फिरतो, तुला कुठे जायचे तेथे जा, माझे काहीही होऊ शकत नाही अशी धमकी ते मला देत असतात. त्यांच्या प्रेयसीने तर मला जीवे मारण्यासाठी एका भाडोत्री गुंडाला सुपारीही दिली होती परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही अशी खळबळजनक माहितीही डॉ.भावना यांनी पत्रकारांना दिली आहे.
डॉ. भावना पुढे म्हणाल्या की माझ्या पतीचे आणि त्यांच्या प्रेयसीचे 118 अश्लील व अतिशय घाणेरडे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. याचा जाब मी माझ्या पतीला विचारला असता तेव्हापासून मला मारहाण सुरू झाली आहे. स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च हा माणूस करत नाही परंतु प्रेयसीच्या गर्भपाताचा खर्च मात्र हा माणूस करतो अशी पक्की माहिती माझ्याकडे आहे असेही त्या म्हणाल्या.
पती सतत जातीवाचक शिवीगाळ करीत असतात, तुम्ही महा.. आहात, तुमची लायकी नाही बंगल्यामध्ये राहण्याची, निघ बाहेर असे धमकावत मारहाण केली जात आहे. मारहाण सुरू असताना सासू कडूनही त्यांना साथ मिळते. सासू ही म्हणते की हिचा एकदाचा विषय संपवून टाक, तुला कोणती बाई घरात आणायची आण परंतु हिला बाहेर काढ. आमच्या मुलाने चार बायका आणल्या तरी आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही, आमचे घर आहे, आमची मर्जी आहे तुम्ही बाहेर निघा असेही सासू कडून बोलले जात आहे. वारंवार आमची जात काढली जात आहे व लाथा बुक्क्यांनी मारहाण होत आहे. त्यामुळे आम्ही दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी याबाबत दौंड पोलिसांकडे तक्रार केली. परंतु पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. उशिरापर्यंत आम्हाला बसवुन ठेवण्यात आले. पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर आमची दखल घेतली गेली व डॉ. सदानंद धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
माझे पती त्यांच्या प्रेयसीच्या नादी लागूनच माझ्यावर अन्याय करीत आहेत व माझ्या जीवावर उठले आहेत असा पुन्हा एकदा उल्लेख डॉ. भावना यांनी केला. तसेच त्या म्हणाल्या की , डॉ. सदानंद धुमाळ त्यांच्याकडून अशी भाषा वापरण्यात येत आहे की आम्ही बायकांना किंमत देत नाही, बायका पायातील चप्पल असतात, वापरायची आणि फेकून द्यायची. अशी भाषा वापरणाऱ्या माणसावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल असताना, व तो पोलीस स्टेशनला हजर असताना त्याला अटक होत नाही असे कसे होते या पोलीस स्टेशनला असा सवालही डॉ. भावना यांनी उपस्थित केला आहे. तुला मारल्याशिवाय मला ती बाई घरात आणता येत नाही अशी भाषा पतीकडून वापरली जात आहे, याची दखल पोलिसांनी घ्यावी. त्यांना अटक झालीच पाहिजे, जर त्यांना अटक झाली नाही तर मी आमरण उपोषण करणार असल्याचे डॉक्टर भावना यांनी शेवटी सांगितले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट (दौंड शहर व तालुका) पक्षाने डॉ.सदानंद धुमाळ याला त्वरित अटक करावी अशा मागणीचे निवेदन दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांना दिले आहे. डॉ. धुमाळ याला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही पक्षाने निवेदनातून दिला आहे.