पुणे : पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागून यात 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर ही आग पुलाखालील इतर गाड्यांनाही लागली आणि त्यामुळे आगीचे लोळ चे लोळ उठून ते लांबूनही दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आग लागल्याची ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कुनेगाव पुलाजवळ घडली आहे. पुलाजवळ असलेल्या काही गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर त्यातील केमिकल पेटत पुलावरून खाली पडल्याने यात तीन जण गंभीररित्या भाजले होते.
या घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करताना, मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. असे म्हटले आहे.