दौंड : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वर्षभर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना दौंडमध्ये समोर आली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून येथील मिलन गोविंद कांबळे याच्या विरोधात दौंड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी दौंड-पुणे अपडाऊन करून कॉल सेंटरमध्ये काम करते. दौंड मध्येच राहणाऱ्या आरोपी मिलन याच्याशी तिची ओळख होती. त्यातूनच मागील चार वर्ष दोघांमध्ये प्रेम संबंध झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखविल्याने तरुणीने त्याच्याबरोबर संबंध ठेवले. जानेवारी 2022 मध्ये आरोपीने तरुणीला त्याच्या मुंबई येथील बहिणीच्या घरी नेले. मी येथेच नोकरी करतो व तुझ्याशी लग्नही करतो असा विश्वास आरोपीने दाखविला. यादरम्यान वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवीत त्याने शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून जुलै 2022 या महिन्यामध्ये तरुणी गरोदर राहिली. हे आरोपीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिला पपई खाऊ घालून तिचा गर्भपात केला.
त्यानंतरही तरुणीने त्याला लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. आपण रजिस्टर लग्न करू मी थोडे तुला सोडणार आहे असे म्हणून त्याने वेळ मारत नेली. काही कारणावरून आरोपीच्या बहिणीचे व पीडित तरुणीचे भांडण झाले व तरुणीला बहिणीने मुंबई येथील घरातून हाकलून दिले. तेव्हा आरोपीने ही मुलीला दौंडला जाण्यास सांगितल्याने ती दौंड ला येऊन राहू लागली. दोन आठवड्यानंतर आरोपीही दौंडला आला व पूर्वीप्रमाणेच पीडित तरुणीशी बोलू लागला.दि.14 जानेवारी 2023 रोजी रात्री 9 वा. सुमारास आरोपीने तरुणीला साठेनगर येथील खोलीत नेले व पुन्हा लग्नाचे आमिष दाखवीत संपूर्ण रात्र तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारले असता आरोपीने तिला मारहाण केली व पोलिसात गेली तर बघून घेईन अशी धमकीही दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत.