सहकारनामा
दौंड : रेल्वे लोकोशेड चोरी प्रकरणी फरार असलेल्या आरोपीच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून शहानु तुकाराम कमाने (रा. भिमनगर,दौंड)असे अटक आरोपीचे नाव आहे.
दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि.15 मे 2021 ते 16 मे दरम्यान दौंड मधील तुकाई नगर परिसरातील रेल्वे लोको शेड मधील शिवराम इलेक्ट्रिकल कंपनीचा 3 लाख 5 हजार रुपयांचा (एल. ए. डी. लाईट व केबल) मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
पोलिसांच्या तपासामध्ये 5 जणांच्या टोळीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे, यापैकी आरोपी सोमनाथ ढवळे, ऋषिकेश फासगे, विशाल दुमावत यांना पोलिसांनी अटक केली मात्र शहानु कमाने फरार होता त्याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान शहानु हा भिमनगर परिसरातील कचरा डेपो येथे येणार असल्याची खबर मिळताच दौंड पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यास शिताफीने अटक केली.
पोलीस उपअधीक्षक राहुल धस व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार भाकरे,पो. हवा. पांडुरंग थोरात, पो. ना. किरण राऊत, अमोल राऊत, अमोल गवळी यांच्या पथकाने कामगिरी बजावली.