‘वाखारी’ च्या ‘शेळके’ परीवारांकडून ‘हज’ ची परंपरा कायम! ‘११००’ वर्षांची जुनी परंपरा नव्या पिढीनेही जपली

अब्बास शेख

दौंड तालुक्यातील वाखारी गावचे शेळके बांधव आपल्या परिवारासह ‘हज’ला निघाले आहेत या गोष्टीवर विश्वास बसत नाही ना! पण हे खरं आहे आणि या मागे सुमारे ११०० वर्षांची मोठी परंपरा आहे. मात्र हि हज ची परंपरा अरब मधील मक्केची नसून वाखारितील शादावल बाबा दर्गा ते केडगाव मधील चाँद तारा मस्जिद अशी आहे. याबाबत जाणून घेऊया वैशिष्ट्यपूर्ण माहिती..

हज परंपरा पूर्ण करत असताना शेळके बांधव


वाखारी ता.दौंड येथे सय्यद शहामीर उर्फ शादावल बाबा यांची प्रसिद्ध दर्गा आहे. या परिसराला अगोदर रोजा चा मळा असेहि म्हटले जात होते. या दरग्याचा मुख्य मान हा या रोजाच्या मळ्यातील शेळके परीवारांचा असतो. त्यामुळे दर वर्षी एक दिवस रोजाच्या मळ्यातील शेळके परिवारीतील सर्व कुटुंबे हि ‘हज’ ला निघत असतात.

मस्जिदच्या आवारात मलिदा नैवद्यावर फातेहा देताना दर्गा चे मुजावर रज्जाक इनामदार व शेळके बांधव


अशी आहे ‘हज’ ची परंपरा
जशी या दर्ग्याची स्थापना झाली तशी सुमारे 1100 वर्षांपासून हि परंपरा चालत आली असून या परंपरेनुसार अगोदर दर दोन तीन वर्षांनी रोजाच्या मळ्यातील सर्व शेळके परिवारातील कुटुंबे हि हज ला निघायची. आता मात्र दर वर्षी हज ला निघून ते आपले पारंपारिक कर्तव्य पार पाडत असतात.
या हज ची परंपरा अशी आहे की ज्या दिवशी हज ला निघायचे त्याच्या एकदिवस अगोदर दरग्यामध्ये सर्वांनी एकत्र यायचे. मग त्या रात्री दरग्यातच मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी तेथेच सर्वजण अंघोळ करायची.

हज ला आल्यानंतर लोबान टाकताना महिला भगिनी

सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वांनी उपवास ठेवायचा आणि ज्यांची लग्ने झालेली आहेत त्यांनी हातात फावडे, झोळी घेऊन वाखारी, केडगाव परिसरामध्ये घरोघरी जाऊन धान्य गोळा करायचे. आणि महिलांनी केडगाव गावातील मस्जिदच्या बाहेरील वसरीमध्ये येऊन तेथे गोळा होत असलेल्या धान्याचा मलिदा करायचा. धान्य गोळा करताना जो पर्यंत धान्य गोळा करणाऱ्यांच्या हातातील फावडे पडत नाही किंवा जो पर्यंत कुणी धान्यामध्ये गहू देत नाही अथवा कुणाची कंदुरी खायला येत नाही तोपर्यंत हे धान्य सर्वांनी गोळा करत रहायचे हि महत्वाची परंपरा आजही प्रचलित आहे.

मलिदा तयार करताना महिला भगिनी

ज्यावेळी या तीन पैकी एक गोष्ट घडते त्यावेळी यातील जितके धान्य गोळा झाले आहे ते दळले जाते आणि त्याचा अगोदर मालिद्याच्या नैवद्य तयार करून त्यावर दर्ग्याच्या मुजावर कडून फातेहा दिल्या जातात. आणि त्यानंतर सर्वजण पुन्हा वाखारी येथील रोजाच्या मळ्यात असणाऱ्या दरग्यात जाऊन तेथे कालवण आणि राहिलेल्या धांन्याच्या भाकरी बनवून सर्व कुटुंबे तो प्रसाद ग्रहण करता आणि अश्या प्रकारे येथील ‘हज’ परंपरेचा समारोप होतो.

या पारंपरिक कार्यक्रमाला महिलांचाही सहभाग लक्षनीय असतो

हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐकतेचे प्रतीक असलेली हि दर्गा संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असून या देवस्थानाला मानणारा मोठा भक्त वर्ग आहे.