केडगावमधील जिल्हापरिषद शाळांची दुरवस्था! शाळेच्या आवारात कचऱ्याचा ढीग अण मेलेली कुत्री..

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन आणि केडगाव गावठाण येथे असणाऱ्या जिल्हापरिषद शाळेच्या आवारामध्ये सध्या दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या शाळेत शिकले, वाढले, संस्कार झाले त्याच शाळेप्रति आज लोकांच्या मनात काय भावना आहे हे या फोटोतील चित्रे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल.

ज्या शाळेत विद्या घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात त्याच केडगाव स्टेशन येथील जिल्हापरिषद शाळेला खेटून असलेल्या भिंतीलगत कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा महिनोमहिने कुणी उचलताना दिसत नाहीये त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असते. तर याहीपेक्षा बिकट परिस्थिती केडगाव गावठाणातील जिल्हापरिषद शाळेची झालेली दिसून येत असून शाळेच्या मुख्य द्वाराच्या भिंतीलगत चक्क मेलेली कुत्री आणून टाकली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर येत आहे. या सर्व प्रकारामुळे शाळेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या या आवरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्या मिळून परिसराची स्वच्छता करताना दिसतात. मात्र याचे गांभीर्य येथील लोकांना दिसत नाही त्यामुळे स्वच्छ जागेमध्ये कचरा टाकणे, मेलेली जनावरे आणून टाकणे असले भयंकर प्रकार येथे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीने येथे त्वरित लक्ष घालून स्वच्छता करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.