अब्बास शेख
पुणे : समाजात पोलीस हे रक्षक म्हणून ओळखले जातात मात्र काहीवेळा हे रक्षकच कसे भक्षक बनतात हे अनेकवेळा समोर यवत असते. असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील देलवडी येथे राहणाऱ्या त्या महिला पोलीसासोबत घडल्याने त्या बिचारीने अखेर आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले आहे.
घरात लग्नाची धामधूम होती. दिपालीचा साखर लपुडा होऊन काही दिवसांत तिचे लग्न होणार होते. मात्र तिचे लग्न हे त्या पोलीस नाईक असणाऱ्या आणि वयाची चाळीशी ओलांडलेल्या त्या पोलिसाला मान्य नव्हते कारण दिपालीने जर कुठे अन्य ठिकाणी लग्न केले तर ते मी मोडीन आणि तिच्यासोबत जबरदस्तीने दुसरे लग्न करील अशी स्वप्ने हा रक्षका मधला भक्षक पाहत होता. त्यामुळे तो दीपालीला वेळोवेळी ट्रास द्यायचा, मारहाण करायचा. याच दरम्यान दिपालिला काविळीचा त्रास होत असल्याने ती देलवडी (दौंड) येथे आपल्या घरी आली. मात्र येथे आल्यानंतरही त्या पोलिसाचे वारंवार फोन येत होते आणि ती उचलत नव्हती. तिने हि बाब आपल्या लहान भावालाही सांगितली होती. याच दरम्यान दिपालीचे लग्न जमले आणि तिचा साखर पुडा झाला. मात्र दिपालीचे लग्न जमलेय हे त्या भक्षक पोलिसाला समजले आणि त्या भक्षक पोलिसाने दिपालीचे जिथे लग्न होणार होते तेथे नवऱ्या मुलाच्या घरच्यांशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने एकाचे दोन सांगून त्यांच्या मनात शंका उपस्थित होईल असे बोलून त्यांना या लग्नाला नकार द्यावा असा प्रयत्न करू लागला. हि गोष्ट ज्यावेळी दिपालीचे वडील आणि दिपालिला समजली त्यावेळी मात्र दीपाली या सर्व प्रकारामुळे कमालीची तणावात गेली आणि तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता अचानक दिपालीच्या आईचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यावेळी दिपालीचा लहान भाऊ दिपालीच्या खोलीकडे धावला आणि समोर पाहतो तर काय की त्याच्या बहिणीने गळफास घेतला होता.हे सर्व होत असताना त्यांनी पोलिसांना फोन लावले आणि रोहित जो दीपालीचा भाऊ आहे त्याने आपले नेट चालू केले. नेट चालू करताच दीपालीने पाठविलेला मेसेज त्याच्या नजरेस पडला आणि त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, कारण त्या मेसेज मध्ये लिहिले होते की.. छकुल्या मला तुला त्रास नाही द्यायचारे, तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा, तुला सोडून जावेसे वाटत नाही रे, पण काय करू मला त्या वाल्मीक आहिरे ने खूप त्रास दिलाय, त्याच्यामुळेच आज ही वेळ आली आहे आणि त्यामुळे आत्महत्या करत आहे. आई, वडिलांची काळजी घे, आणि त्याला सोडू नको, चांगली अद्दल घडव. माझ्या पप्पानी मला कधी मारले नाही पण त्याने मला खूप मारलंय, खूप त्रास दिलाय… असे बरेच काही लिहून तिने शेवटी त्या रूमची चावी रूम मालकिणीला दे व लाईट बिल भरायचे राहिले आहे तेवढे, असा मेसेज दिपालीने करून आज या जगाचा निरोप घेतला आहे.
प्रश्न असा उपस्थित होतो की एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जिद्दीने पोलीस होण्याचे स्वप्न पाहते आणि ते स्वप्न तिच्या अपार जिद्दीने, कष्टाने साकार होते मात्र त्याचवेळी तिच्या जीवनात तो नराधम डोकावतो. ज्याचे लग्न झाले आहे, चाळीशी ओलांडली आहे तो तिला मोठ्या प्रमाणावर ट्रास देतो. दौंड कुठे आणि पालघर कुठे ती त्यावेळी कुणाकडे त्याची तक्रार करणार कारण तो तिला मारहाण करण्याची कोणतीच संधी सोडत नव्हता हे तिच्या त्या मेसेजवरून समजते जो तिने आपल्या भावाला केला आहे. आज तिने आपल्या सुंदर आयुष्याची स्वप्ने रंगवली होती नंतर तीही त्या नराधमाणे विस्कटून टाकली आणि शेवटी तिला आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. जर पोलिसांपासून खुद्द पोलिसच सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीपाली बापूराव कदम (वय 26, पोलीस, रा.मूळ, देलवडी, दौंड पुणे) हिच्या आत्महत्येप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पोलीस नाईक वाल्मिक गजानन आहिरे (पोलीस नाईक, पालघर मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद रोहित बापुराव कदम (वय 24, रा.देलवडी,ता.दौंड पुणे) याने दिली आहे.