Accident : दौंडजवळ झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचे शिर झाले धडापासून वेगळे



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड जवळ दुचाकीस्वाराचा अपघात होऊन  त्याचे शीर धडापासून वेगळे होऊन काही अंतरावर जाऊन पडल्याची भयानक घटना घडली आहे. अगोदर हा अपघात दुचाकीस्वार बॅरिकेटला धडकल्याने झाला असल्याचे सांगितले जात होते मात्र हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंडवरून बारामतीकडे जाणार्‍या लेनवर पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत असून या अपघातामध्ये दुचाकीस्वार अक्षय पांढरे (वय 25) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ड्रेनेजलाईनचे चेंबर तुटले होते त्यामुळे तेथे पाणी तुंबले होते. या पाण्यामुळे अपघात होऊ नये म्हणून त्याठिकाणी हे बॅरिकेट लावण्यात आले होते.

मात्र हाच परिसर दुचाकीस्वाराचा कर्दनकाळ बनला असल्याचे बोलले जात आहे. स्पीडमध्ये असलेल्या या दुचाकीस्वार आणि अज्ञात वाहनाचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की या धडकेनंतर या दुचाकीस्वाराचे शीर धडापासून वेगळे होऊन काही अंतरावर जाऊन पडले तर त्यामागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला तर यात जखमी झालेल्या अन्य एकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.