खाजगी सावकाराची युवकाला बेदम मारहाण, माजी उपनगराध्यक्षासह मुलावर गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : व्याजाची रक्कम बँक खात्यावर जमा झाली नाही याचा राग मनात धरून खाजगी सावकाराने युवकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील बंगला साईड परिसरात घडली आहे.

याप्रकरणी अनिकेत रामदास बोरकर (वय 30,रा. स्टेट बँकेजवळ, महादेव गल्ली, दौंड) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शामराव जाधव व मुलगा रितेश राजेश जाधव (दोघे रा. फादर हायस्कूल पाठीमागे ,दौंड) यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 तसेच भारतीय न्याय संहितेच्या 118(1), 119(1), 115(2), 352, 351(2), 3(5) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 22 जून रोजी दुपारी 1:45 च्या सुमारास फादर हायस्कूलच्या पाठीमागील परिसरात घडली. फिर्यादी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी आपल्या मालकीचे चारचाकी वाहन जाधव यांच्याकडे गहाण ठेवून महिना पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले. व्याजाची देणे असलेली रक्कम वडिलांच्या खात्यावर जमा झाली नाही असे सांगत आरोपी रितेश याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांचा मित्र भांडणे सोडविण्यासाठी आला असता आरोपीने त्याला सुद्धा मारहाण केली. आरोपी रितेश याने जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना बेदम मारहाण करीत जखमी केले तसेच खिशातील 3 हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले व उर्वरित 11 हजार 800 रुपये लगेच आणून दे नाहीतर तुझी गाडी जाळून टाकीन अशी धमकी दिली असे फिर्यादित नमूद करण्यात आले असून यावेळी राजेश जाधव तेथे उपस्थित होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.