स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक आचारसंहिता लक्षात घेता ‘या’ तारखेच्या आत प्रस्तावित कामे सुरु करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्रस्तावित कामांना २५ जून पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन ३१ जुलै २०२५ चे आत प्रस्तावित कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी बोलताना, जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपले प्रस्तावास तात्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी व २५ जून पूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे ३१ जुलै, २०२५ च्या आत सुरू करावीत, डिसेंबर २०२५ अखेर सर्व कामे पूर्ण करावीत. वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाच्या मान्यतांसंदर्भात पाठपुराव्याकरिता यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.