अख्तर काझी
दौंड : दौंड मध्ये एका 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. श्वेता रोहित ओहोळ(वय 25,रा. बंगला साईड, दौंड) असे आत्महत्या केलेल्या पिडीतेचे नाव आहे. ही आत्महत्या नसून पती व तिच्या सासरच्या लोकांनीच तिला मारले आहे असा आरोप पीडीतीचे नातलग करीत आहेत. पती व तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करत त्यांनी तिचा मृतदेह पोलीस स्टेशन आवारातच आणून ठेवला आहे.
यावेळी पीडित महिलेचे नातलग व ख्रिश्चन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत पुढील कारवाईस सुरुवात केली आहे. मृत श्वेताला दोन वर्षाचा मुलगा असून सध्या ती दोन ते तीन महिन्यांची गरोदर होती व तिच्या पोटामध्ये जुळे असल्याची माहिती तिच्या नातंलगांनी दिली आहे. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह येथून उचलणार नाही अशी भूमिका नातलगांनी घेतली आहे.