‘तू’ आत्ता वाचलीस पण तुला सोडणार नाही! दौंडमध्ये भर चौकात युवतीवर हल्ला… मारहाण करून हल्लेखोर पसार

दौंड : दुचाकीवरून घरी जाणाऱ्या तरुणीला दोन अज्ञात इसमांनी भर चौकात काठीने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणीच घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बंगला साईड परिसरातील देशमुख गॅरेज समोरील रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या तरुणीला दोन अज्ञात इसमांनी काठीने मारहाण केली. प्रिया उमेश गायकवाड (वय 22,रा. फादर हायस्कूल जवळ, दौंड) असे या तरुणीचे नाव असून तिने याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी दोन अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दि.25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान फिर्यादी दुचाकीवरून येथील सरपंच वस्ती येथून कामावरून घराकडे चालल्या होत्या. त्यांची दुचाकी देशमुख गॅरेज परिसरात आली असता पाठीमागून दोन युवक दुचाकीवर आले व त्यांनी मुलीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणी न थांबता पुढे जात आहे हे पाहून दुचाकी वरील युवकाने तिच्या अंगावर गुलाल मिश्रित पाणी फेकले. त्यामुळे तरुणीने आपली दुचाकी थांबवली, तिची दुचाकी थांबताच युवकाने त्याच्या हातातील काठीने तरुणीच्या डोक्यावर प्रहार केला. व जाता जाता, तू आत्ता वाचलीस पण तुला सोडणार नाही असा दम दिला. हल्लेखोर 24-30 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती फिर्यादी यांनी दौंड पोलिसांना दिली आहे.