दौंड शहरात चाललंय काय..? महिलेवर बलात्कार, अवैध धंद्यांचाही सुळसुळाट

अख्तर काझी

दौंड : शहरातील एका चाळीत असणाऱ्या घरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार करण्याकरिता आरोपीला मदत करणाऱ्या महिलेचाही आरोपींमध्ये समावेश आहे. इरफान शब्बीर खान (रा. कुंभार गल्ली, दौंड) असे गुन्हा दाखल आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दिनांक 2 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2024 च्या दरम्यान घडली. दिनांक 12 सप्टेंबर रोजी संबंधित महिलेने पीडित तरुणीला एका चाळीत असणाऱ्या आपल्या घरी बोलवले. नंतर आरोपी इरफान हा त्या घरात आला. त्यावेळी महिलेने पीडित तरुणीला जबरदस्तीने आरोपी सह खोलीत ढकलून देत खोलीला बाहेरून कडी लावली.

आरोपीने तरुणीला मारहाण केली व तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अत्याचार केला असे पिडीत महिलेने आपल्या फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणानंतर दौंड पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 69, 127(3),115(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दौंड शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर – दौंड शहर व परिसर अवैध धंद्यांचे माहेरघर बनू लागले आहे. शहरात असलेले दारूचे अवैध धंदे बंद करण्याची मागणी आता लहुजी यंग ब्रिगेड संघटनेने सुद्धा केली आहे. अवैध धंदे आणि दारुड्यांमुळे साठे नगर परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर व परिसरात दारूचे( हातभट्टी) अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत. या दारुमुळे युवा वर्ग व्यसनाधीन झाला आहे. हातभट्टी दारू विक्रीचे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन तूपसौंदर्य, अमित मोरे, मोहन कांबळे, सागर घोडे, जयदीप बगाडे, तुकाराम तूपसौंदर्य, दीपक लोखंडे, रितेश घोडे ,अनिल तूपसौंदर्य आदि उपस्थित होते.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कर्तव्य बजावताना गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे दौंडकर नागरिक आपणाकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.