Used for burning PPE kits, masks धक्कादायक – दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर जाळण्यासाठी आणले जातेय कोरोना काळात वापरलेले पीपीई किट आणि मास्क! तहसीलदारांचा कडक इशारा तर वैद्यकीय अधिक्षकांची चेतावणी..



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर कोरोना काळात वापरण्यात आलेले पीपीई किट आणि मास्कचा सर्रास वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.



दौंड तालुक्यातील खोपोडी, दापोडी यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या गुऱ्हाळांवर हा ‛कोरोना कचरा’ वापरण्यात येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने त्वरित अशा प्रकारच्या कचऱ्यावर आणि तो कचरा आणणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.



कोरोना काळात वापरलेले पीपीई किट, हॅन्डग्लोज आणि मास्क यांची वैद्यकीय निरीक्षणाखाली त्याची विल्हेवाट लावली जाते मात्र येथील प्रकार पाहिल्यानंतर या गुऱ्हाळांवर गाड्याच्या गाड्या भरून येणारे हे पीपीई किट, ग्लोज आणि मास्क येतात कुठून आणि  याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.



ज्या गुऱ्हाळांवर कोरोना काळात वापरलेले अशा प्रकारचे पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्क सापडतील त्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आरोग्यास घातक ठरणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तू कुणीही जाळण्यासाठी गुऱ्हाळांवर आणू नये.


“श्री.संजय पाटील

– तहसीलदार दौंड”

————————————-

पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्क हे बायो मेडिकल वेस्ट आहे, आणि अशा पद्धतीच्या बायो मेडिकल वेस्ट ची विल्हेवाट सायंटिफिक पद्धतीनेच लावावी लागते त्यामुळे ते अशा कोणत्याही इतर अन्य ठिकाणी जाळता येत नाही. कोरोना काळात वापरण्यात आलेल्या बायो वेस्ट च्या या वस्तूंमुळे इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो त्यामुळे असल्या वस्तू कुणीही हाताळू नये आणि जाळण्यासाठी आणू नये.


– “डॉ.संग्राम डांगे

अधीक्षक  उपजिल्हा रुग्णालय, दौंड”

————————————-


दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांवर सध्या कोरोना काळात वापरण्यात येत असलेले पीपीई किट, हॅन्ड ग्लोज आणि मास्क आढळून आले आहेत, मी स्वतः काही गुऱ्हाळांवर जाऊन याची शहानिशा केली असता मला धक्काच बसला, कारण या ठिकाणी काम करणारे कामगार हे हाताने या वस्तू उचलून गुऱ्हाळांच्या चुलांगणामध्ये टाकताना आढळून आले. त्यामुळे अशा गुऱ्हाळांवर आता कडक कारवाई होणे गरजेचे आहे.


“नानासाहेब टेंगले

अध्यक्ष (पुणे जिल्हा) –  अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ”